Saturday, 12 September 2015

शोधग्रामचे पक्षी

गडचिरोलीत साधारणपणे मार्च मध्ये ऊन तापायला लागतं. भीती वाटावी इतका कडक उन्हाळा येथे पडतो. ४५ सेल्सियस पर्यंत सहज तापमान जाते. मात्र या उन्हाळ्याची मी आतुरतेने वाट पाहत असतो. उन्हाळ्यात गडचिरोलीच्या सगळ्या जंगलातून जणू आमच्या घराभोवती पक्षी जमा होतात. कुलरमधून पाझरणारे, ठिबकमधून गळणारे पाणी पितात. कुलरच्या थंड हवेचा अस्वाद घेत खिडकीत रांग लावून बसतात. paradise flycatcher (स्वर्गीय नर्तक) या अतिशय सुंदर पक्ष्याला शोधण्यासाठी मी आकाशपाताळ एक करायचो, तो आमच्या धुणं वाळत घालायच्या दोरीवर येऊन बसतो. Tickell's Blue Flycatcher (नीलीमा) आमच्या खिडकीत घरटं करतो.
हे पक्षी, त्यांचे सुंदर रंग, विणीच्या काळात येणारा पिसारा-फुटणारा आवाज, प्रणयाराधना, त्यांची घरटी, मासेमारी, हवेत झेप मारून माशा पकडणे सगळंच अद्भुत आहे. हा खजिना आपल्या भोवतीच आहे. वाघ पहायला बुकींग करून ताडोबाला जावे लागते. पक्षी मात्र सगळीकडेच असतात. मी हैदराबादला असताना अगदी सिमेंटच्या जंगलातही दिसायचे. खरं सांगतो, हे पक्षी पाहण्याचा आनंद वाघ पाहण्यापेक्षा मुळीच कमी नसतो. आपल्यासारखे जे लोक वेद शिकू शकत नाहीत, त्यांच्यासाठी सहज उपलब्ध असा तो विठ्ठल आहे. मात्र आपल्या भोवती असले तरी अनुभवण्यासाठी काळजी घ्यावी लागते. आपलंच तुणतुणं लावायची मला सवय असेल, तर कितीही सुंदर शीळ घातली तरी पक्षी ऐकू येत नाहीत. मनात माझेच विचार सुरू असतील, तर समोर असूनही पक्षी दिसत नाहीत. त्यादृष्टीने छोटे पक्षी माझे खूप मोठे गुरू आहेत. दुस-यांचे ऐकायला शिकवतात, सध्या जगत असलेला क्षण enjoy करायला शिकवतात.
चौथीत एका परीक्षेत नंबर आला म्हणून मंजिरी मावशीने सलीम अलींचे Book of Indian Birds दिले. माझ्या आयुष्यातले ते सर्वांत मोठे gift. त्यातली चित्रे बघत पक्षी ओळखायला शिकलो (इंग्लिश वाचता यायचे नाही.), शिकत आहे. पुढे आईने हे पक्षी चित्रबद्ध करायला कॅमेरा दिला. माझी ही आवड पाहून अनिता (Heather Ann Gardener) या मैत्रिणीने सध्याचे latest पुस्तक Birds of Indian Subcontinent दिले. सर्वांचा मी ऋणी आहे.
या अल्बममधले फोटो हे शोधग्राम व २ किमीच्या परीघात मला दिसलेले पक्षी. हिमनगाचे एक टोक. या फोटोंमध्ये कलाकौशल्य नाही. फोटोग्राफीच्या अॅंगलने बहुतेक सगळे सुमार फोटो आहेत. मात्र आपल्याभोवती असणा-या मोठ्या जगाचा मी खूप छोटा भाग असल्याचे भान मला यातले पक्षी मला देतात. त्याच वेळी मी कधीच एकटा नसल्याचा दिलासा देतात. या सुंदर मित्र-मैत्रिणींची तुमच्यासोबत ओळख करून देत आहे...






































Monday, 18 June 2012

सेवाग्राममधील एक संध्याकाळ

            स्वतः नायनांसोबत (डॉ. अभय बंग) गांधीजींचा सेवाग्राम आश्रम पाहण्याचं भाग्य मला मिळालं. नायनांचं बालपण वर्ध्याचं. बालपणीचे संस्कार सेवाग्राम आश्रमातील शाळेत घडले. पुढल्या आयुष्यात याच संस्कारांचा ठसा मनावर राहिला. गांधींच्या तत्त्वांवर आधारित असे थक्क करायला लावणारे काम उभे केले. मात्र माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला आपल्या उगमाबद्दल प्रचंड ओढ असते. सेवाग्राम आश्रम पाहून नायना थोडे हळवे झाले होते. कधीच आपल्या बालपणात बालपणात हरवून गेले होते. एरवी मोजके बोलणारे नायना तिथल्या प्रत्येक इमारत, प्रत्येक झाडाबद्दल भरभरून सांगत होते. मीही भारावून जावून ऐकत होतो, त्यांचा एकही शब्द पडू नये याची काळजी घेत होतो.
            शाळा, वसतीगृह, अतिथीगृह, महादेवभाई व बापूंचे कार्यालय पाहिल्यानंतर शेवटी जिची आतुरतेने वाट पाहत होतो ती बापूकुटी आली. कुटी बांधण्यापूर्वी गांधींनी दोन अटी घातल्या होत्या. एक, कुटी ५०० रुपयांच्या आता बनावी. दुसरी, कुटी बांधण्यासाठीसाठी आश्रमापासून ५ मैलाच्या परिसरात जे सामान मिळू शकते तेवढेच सामान वापरावे. एखाद्या सामान्य खेड्यापासून ५ मैलाच्या अंतरावर काय काय मिळू शकते? माती आणि लाकडे. केवळ माती व लाकडापासून अतिशय टुमदार व कौलारू कुटी बनवलेली आहे. कुठेही लोखंडाचा अथवा सिमेंटचा वापर करण्यात आलेला नाही. अगदी खिडक्यांचे गज व बीजागरीही बांबूपासून बनवलेले आहेत. कुठल्या मर्यादेपर्यंत आपल्या गरजा कमी करता येऊ शकतात त्याचे ही कुटी म्हणजे उत्तम उदाहरण आहे. आणि हो, साधेपणामुळे सौंदर्य कुठेच कमी झालेलं नाही. लाखो रुपयांच्या व हजारो मैल दूरच्या राजस्थानी टाईल्स, वरून मिरर पॉलिश, भिंतींना रासायनिक रंग अशा कोणत्याही आधुनिक घरापेक्षा स्वच्छ व सारवलेली कुटी मला लाखपटींनी सुंदर वाटते. आपण नेहमी ताज महाल बांधण्याच्या मागे लागलेलो असतो. तो बांधता बांधता मनावर ताणतणावाचे प्रचंड ओझे येते. तो बांधून झाल्यानंतर एवढा खर्चिक महाल जपता जपता पुन्हा नाकी नऊ येतात. बापूंच्या कुटीत मात्र जपण्यासारखे काहीच नव्हते. हां, इतक्या वर्षांनी परवा बापूंचा चष्मा चोरीला गेला. यावर पवानारचे श्री गोपाळ बजाज मोठ्या मार्मिकपणे म्हणाले 'चष्माच चोरीला गेला ना, बापूंची दृष्टी तर नाही गेली?'
            कुटीला कुंपणही बांबूचे होते, कुटीइतकेच सुंदर! कुंपणाबाहेर तीन भले मोठे दाट वृक्ष होते, दोन पिंपळाचे व एक बकुळाचा. पहिले पिंपळाचे झाड गांधी प्रथम सेवाग्रामला आले तेंव्हा लावले होते, तर दुसरे विनोबा भूदान यात्रा आटोपून परत आले तेंव्हा लावले होते. (त्यावेळी नायनाही विनोबांसोबत होते.) किती सुंदर कल्पना आहे celebration ची! झाड लावून! शेकडो वर्षे जगणाऱ्या झाडांच्या रूपाने तो क्षण अमर होऊन जातो. आपल्या आनंदाचा इतरांना त्रास नाही व पर्यावरणावरही कोणताच ताण नाही. बकुळाचे झाड कस्तुरबा गेल्या तेंव्हा लावले होते.  दुःखाला सामोरे कसे जावे ह्याचादेखील किती सुंदर मार्ग आहे! मृत्यूचा सामना नवीन जीवाच्या निर्मितीने! ते बकुळाचे झाड आज कस्तुरबांचे जिवंत स्मारक बनले आहे. (नाही तर आजकालचे नेते जिवंतपणी आणि स्वतःचेच भले मोठे पुतळे उभे करतात. हे पुतळे बनवण्याची प्रोसेस ही प्रचंड energy consuming व पर्यावरणाला मारक असते हा निराळाच मुद्दा!) सर्चमध्येदेखील दोन वृक्ष असेच आनंदाच्या क्षणी लावले गेले आहेत. एक वडाचे रोप, अम्मा-नायानांचे (डॉ. राणी व अभय बंग यांचे) गुरू कार्ल टेलर सर्चमध्ये आले होते तेंव्हा त्यांच्या हस्ते हॉस्पिटलजवळ लावण्यात आले होते. आज या वडाचा वटवृक्ष झाला आहे. सर्चच्या दवाखान्यात येणारे सर्व पेशंट्स त्याच्या सावलीत विश्रांती घेतात. दुसरे वडाचे रोप लावून तिबेटचे बौद्ध लामा रिम्पोचे यांच्या हस्ते अतिथीगृहाचे उद्घाटन झाले होते. आज हेदेखील झाड खूप मोठे झाले आहे.
      जी परंपरा गांधींनी सुरू केली, ती आपण चालू ठेवू शकतो का? एक सहज विचार मनात आला होता. आपल्या मित्र-मैत्रिणींना त्यांच्या वाढदिवसाला भेट म्हणून आपण एक रोप दिलं तर? वाढदिवस हे वाढीचे प्रतीक. वाढीसोबत जबाबदारी ही ओघानेच आली. पार्ट्या आणि इतर materialistic gifts देण्याऐवजी आपण एक रोप किमान एक वर्ष जगवण्याची जबाबदारी देऊ शकतो का? एका वनखात्याने किंवा काही ठराविक लोकांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या पर्यावरणाची काळजी घ्यावी त्यापेक्षा हा विकेंद्रीत मार्ग सोपा व सोयीस्कर नाही का? आम्ही सर्चमध्ये वाढदिवस हा झाडदिवस म्हणून साजरा करायचे ठरवले आहे. मित्र-मैत्रिणींना वाढदिवसाला भेट म्हणून झाड देण्याची प्रथा सुरू केली आहे.
      सेवाग्राममध्ये असेच आणखी एक झाड कधी काळी होते. कस्तुरबांच्या शेवटच्या काही दिवसांत गांधी त्यांच्यासोबत जेव्हा फिरायला जायचे, तेव्हा लवकरच बा थकून जायच्या. त्यासाठी गांधींनी एका झाडाभोवती चबुतरा बनवून घेतला होता. थकल्यानंतर बा त्या चबुतऱ्यावर थोडा वेळ विश्रांती घेत व पुन्हा चालू लागत. हे झाड मात्र आम्हाला दिसले नाही. नायनांना खूप हळहळ वाटली. मलाही खूप वाईट वाटले.
      एव्हाना अंधार पडू लागला होता. पाखरे आपापल्या झाडांवर परतत होती. आम्ही सेवाग्राम आश्रमाच्या बाहेर आलो. खारे शेंगदाणे विकणाऱ्या आजी घरी परतण्याची तयारी करत होत्यात्यांच्याकडून शेंगदाणे घेतले. नायना थोडेसे nostalgic झाले होते. परतण्याची वेळ तर झाली होती, पण पाउल मात्र निघत नव्हते. सचिन भाऊंना सुरू केलेली गाडी पुन्हा बंद करण्यास नायनांनी सांगितले. नायना मला घेऊन एका जुन्या इमारतीपाशी आले. तिची अवस्था पाहून ती वापरात नसावी हे कोणीही सांगितले असते. नायनांनी खुलासा केला. हे गांधीजींच्या काळात सुरू झालेले पोस्ट ऑफिस होते. गांधींना एका सर्वसामान्य खेड्यात एक सर्वसामान्य भारतीय बनून राहायचे होते. आश्रमात येण्यापूर्वी गांधींनी प्रथम गावकऱ्यांची परवानगी घेतली. सेवाग्रामला दळणवळण व संपर्काच्या काहीच सोयी नव्हत्या. मात्र व्हाईसरॉयला गांधींशी संपर्क साधता यावा म्हणून ब्रिटीश सरकारने लगेच टेलिफोन लाईन टाकली, पोस्ट ऑफिस बांधले. तीच ही पोस्टाची इमारत! याच इमारतीत रोज गांधींची लाखो पत्रे येत असतील! हेच पोस्ट ऑफिस पुढे बरीच वर्षे वापरात होते. नायना त्यांच्या लहानपणी रोज पोस्ट ऑफिसात जायचे. त्यांना तिकीटे जमवण्याचा छंद होता. पोस्टात कोणाकोणाची पत्रे येतात हे हेरून ठेवायचे व नंतर त्यांच्या घरी जाऊन पाकिटावरचे तिकीट मागायचे. एक पडकी इमारत अनेक आठवणींनी सजीव झाली होती. आज मात्र याच इमारतीशेजारी मोठे, दुमजली नवे पोस्ट ऑफिस बांधण्यात आले आहे.
      आश्रमाच्या बाहेर रचनवादी काम करणाऱ्या विवाहित जोडप्यांसाठी घरे बांधण्यात आली होती. आपले लहानपणीचे घर दाखवण्यासाठी नायना तिकडे घेऊन गेले. काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या होत्या. घरात राहणारेदेखील बदलले होते. पण घराबाहेरचे तुळशी वृंदावन मात्र अजूनही तसेच होते. एका बारीकशा पणतीच्या मंद प्रकाशात ते उजळून निघाले होते. मन प्रसन्न झाले. तिथल्या शांततेत आणि पणतीच्या मंद प्रकाशात अशी काय जादू होती? मला वाटते मन आनंदी राहण्यासाठी साध्या व छोट्या गोष्टी पुरेशा असतात. मात्र बाहेरून आपल्यावर सदैव झगमगाटाचा भडीमार केला जातो. मग आपल्याला मोठमोठे हॅलोजनचे दिवे व डॉल्बीशिवाय आनंदच मिळत नाही, मोठा आवाज करणारे फटाकेच उडवल्याशिवाय चैन पडत नाही, टीव्हीवरच्या अती नाटकी मालिका व सनसनाटी बातम्याच न पाहू तर जीवाची तगमग होते. नाजूक व तरल गोष्टींना प्रतिसाद द्यायची आपली क्षमताच संपून चाललीय की काय अशी कधीकधी भीती वाटते.
      या भारावलेल्या वातावरणात फोटो काढायचा मोह बऱ्याचदा झाला. मोठ्या कष्टाने हात आवरला. काही गोष्टी व काही क्षण मनात नेहमीच ताजे राहतात. आपण बळजबरीने त्यांना कृत्रिमरित्या साठवायचा प्रयत्न करतो व समोर प्रत्यक्ष जे सौंदर्य दिसत आहे ते मात्र पहायला विसरतो. एखाद्या तबलजीचे हात थिरकायला लागल्यावर आपण उत्साहाच्या भरात टाळ्या वाजवाव्यात व टाळ्यांच्या गोंधळात नेमकी सम हरवून जावी असेच काहीसे आयुष्यात घडत असते.
      जाता जाता नायना भावपूर्ण होऊन म्हणाले, “असं वाटतं की वर्षातले किमान १५ दिवस सर्व काही सोडून सेवाग्राममध्ये राहायला यावे.” आयुष्यभर नायनांनी गांधींची निर्गुण भक्ती केली. गांधींनी दाखवलेल्या कठोर कर्मयोगाच्या मार्गावर न थकता चालत राहिले. थक्क करून सोडेल इतके मोठे काम त्यांनी उभे केले. पण तरीही त्यांच्या मनात असणारी आपल्या उगमाबद्दलची ओढ सारखी जाणवत राहते. त्यांच्याकडे पाहून वाटतं कर्मयोगाला संवेदनशीलतेची वा भक्तीची जोड मिळते, निर्गुणाला सगुणाची जोड मिळते तेव्हा उभं आयुष्य बहरल्याशिवाय राहत नाही.

-        निखिल जोशी
गडचिरोली
२९ एप्रिल, २०१२

Sunday, 4 December 2011

शोध स्वतःचा


सिकंदराबादला चंद्रपूरकडे जाणाऱ्या दक्षिण एक्सप्रेस मध्ये मी एकदाचा बसलो, मगच मला विश्वास वाटू लागला की आपण शोधग्राम, गडचिरोलीला जात आहोत. खूप हायसं वाटलं. दोन दिवस का होईना पण मी त्या अंधाऱ्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर डोकं गहाण ठेऊन बसणार नव्हतो. धूरामधून मार्ग काढत सिमेंटच्या जंगलात स्वतःचाच कधीपासून हरवलेला पत्ता शोधत भटकणार नव्हतो. दोन दिवस मी यंत्रमानवांपासून दूर खरोखरच्या माणसांमध्ये मिसळून जाण्यासाठी निघालो होतो. ट्रेनचा भोंगा वाजला आणि मी माझ्या बंदिस्त विश्वात उसना का होईना पण मोकळा श्वास घेतला.

सकाळी साडेपाचला आगगाडीने मराठी मातीत प्रवेश केला. छाती भरून आल्यासारखं वाटलं. २१ वर्षे महाराष्ट्रात होतो तेंव्हा किंमत कळली नाही, पण दोन वर्षं कानपूर व एक वर्ष हैदराबादला राहून चांगलाच वठणीवर आलो होतो. चंद्रपूरला उतरून गडचिरोलीला जाणाऱ्या लाल-पिवळ्या एस.टी.त बसलो. काही गोष्टी या आपल्या खास मर्मबंधातल्या ठेवी असतात. एस.टी. ही त्यांपैकीच एक. मला उगीचच 'बालपण गमले मजला असे काहीसे वाटून गेले. असो.

चंद्रपूर सोडले. पाच मिनिटातच मी पहिली पाटी वाचली, 'सावधान! वाघ-बिबट्यांचा वावर'. अचानक लक्षात आले, अरेच्या, असेही प्राणी निसर्गात असतात हे मी विसरूनच गेलो होतो. नाही तर आमचा वाघाशी संबंध म्हणजे IPL च्या ब्रेक मध्ये ढोणीची 'Save the tiger' ची जाहिरात लागते तेवढाच. मला इकडच्या लोकांचा खूप हेवा वाटला. लगेचच पानगळीचे पण घनदाट जंगल सुरू झाले. अहो उघडी-नागडी, बेअब्रू झालेली जमीन कुठेच दिसेना. जिकडे तिकडे या प्रदेशाची श्रीमंती दाखवणारे पाचोळ्याचे अच्छादन! चैत्र जवळ येऊ घातला होता. पानगळीच्या झाडांना पालवीचे दागिने फुटण्यास प्रारंभ झाला होता. हे दागिने सूर्यकिरणांची पहिली तिरीप पडून खूपच उठून दिसत होते. वसंताची चाहूल लागून फुललेल्या फुलोऱ्यामुळे जंगल रंगीबेरंगी व मोहक वाटत होते.

वाटेत गावांची नावे पण किती सुंदर! मुल, सावली, व्याहाड! अशी काही गावे गेल्यानंतर मध्येच एस.टी.तल्या एका बाळाला शू लागली. त्यासाठी खास आमच्या बसने स्टॉप घेतला. आई बाळाला घेऊन खाली उतरली. बाकीचे प्याशिंजर खिडकीतून 'श्शsss श्शsss' करत बाळाला प्रोत्साहन देऊ लागले. उत्साहाच्या भरात बाळाने विदर्भाच्या भूमीत 'शू'दानाबरोबरच 'शी'दानही केले. एका दयाळू प्याशिंजरने धुण्यासाठी आपली पिण्याच्या पाण्याची बाटली देऊ केली (सरप्रायाझिंगली ती बाटली बिसलेरीची नव्हती!). यथावकाश धुण्याचाही कार्यक्रम पार पडला. असा हा साघ्रसंगीत सोहळा एकदाचा आटोपला आणि प्याशिंजरांनी टाळ्या वाजवल्या. गडचिरोलीला पोचण्यासाठी दोनाचे अडीच तास होतील म्हणून कोणीच गोंधळ घातला नाही. ह्या प्याशिंजरांना घड्याळाचे काटे किंवा कोणतेही इन्सेंटिव्ह कंट्रोल करत नव्हते. म्हणूनच ते जीवनाचा प्रत्येक क्षण जगत होते, अनुभवत होते, त्याचा आनंद घेत होते. सहजपणे एक-दुसऱ्याच्या सुखदुःखात, अडीअडचणीत समरस होत होते.

गडचिरोलीस पोचल्यानंतर धानोऱ्याला जाणारी बस पकडली. गडचिरोलीच्या आसपास विरळ झालेले जंगल पुन्हा एकदा घनदाट झाले. जंगलाचा लांब निर्मनुष्य पट्टा आणि मध्येच नजर लागू नये म्हणून जंगलाच्या कुशीत वसलेली छोटी छोटी गावे. वाटेत एक पाटी वाचली. 'अभिनंदन! अमुक अमुक गावात २००९ साली एकही बालमृत्यू नाही.' सर्च जवळ आल्याची खात्री पटली. चातगावजवळ उतरून थोडेसे चालत गेल्यानंतर मी डॉ. अभय व राणी बंग यांच्या कार्यक्षेत्रात, शोधग्रामला दाखल झालो.

शोधग्रामच्या कमानीतून प्रवेश करतो तोच अतिशय मधुर असा किलबिलाट ऐकून माझी पावले थबकली. पाहिले तर दोन रॉबिन्स कोणत्या तरी विषयावर गंभीर चर्चा करत होते. नाही तर आमच्या डोक्यात दोनच आवाज फिट्ट! एक ऑफिसमधला ए.सी. आणि दुसरा कॉम्प्युटरचा पंखा. ट्राफिकचा गोंगाट तर आजकाल इतका रक्तात भिनलाय की हृदयाच्या ठोक्यांप्रमाणे तो ऐकू येणेही बंद झालंय. पक्ष्यांचा आवाज सोडाच, माणसेही एकमेकांशी बोलणे म्हणजे दसरा-दिवाळी. असो. त्या रॉबिन्सच्या चर्चेत अनेक पक्ष्यांनी सहभाग घेणं सुरू केलं. फुलपाखरे मध गोळा करता करता हळूच ही चर्चा ऐकू लागली. मन कसं प्रसन्न टवटवीत झालं.

शोधग्रामला पोहोचण्याआधीच मन मोहोरून गेलं होतं. आता शोधग्राममध्ये पुढचे दोन दिवस जे काही अनुभव मिळतील ते तर बोनस होते. तसं पाहिलं तर पक्षी, झाडे पाहून एवढं खूष होण्याची काय गरज होती? मला वाटतं निसर्गाकडे माणसाची एक नैसर्गिक ओढ असते. मात्र आपल्या मनात पैसा व इतर materialistic गोष्टी हेच माणसाच्या आयुष्याचे अंतिम ध्येय आहे असे घडत्या वयात बिंबवले जाते. मग आपण आपल्या सर्व नैसर्गिक कलांना बगल देउन निसर्गापासून दूर पैशाच्या खाणीत मोलमजुरी करत राहतो. एक वेगळे छोटेसे कृत्रिम विश्व आपल्या भोवती तयार करतो. याच मर्यादित जागेत आपला विस्तार करण्यासाठी धडपड करतो. या विस्ताराची किंमत मग मनाची शांती देउन चुकवावी लागते.

शोधग्रामचे हे प्रवेशद्वार मला कृत्रिम व मर्यादित विश्वाच्या भिंती ओलांडून अधिक नैसर्गिक आणि अधिक स्वाभाविक विश्वात प्रवेश करण्यासाठी खुणावत तर नव्हते?


    - निखिल अनिल जोशी
            हैदराबाद  
      मार्च, २०१०

Monday, 22 November 2010

भेंडीकनार (गडचिरोली)



भेंडीकनार, गडचिरोली जिल्ह्यातल्या घनदाट अरण्यात वसलेलं एक आदिवासी गाव. गाव इतकं रानात आहे की ऐन थंडीत घाम फुटावा. पण जितकं भीतीदायक तेवढंच, किंबहुना काकणभर अधिकच सुंदर. भीतीदायक एवढ्यासाठी जंगली श्वापादांसोबत नक्षलवाद्यांच्या गोळीचाही इकडे सहज वावर आहे. अशा गावांमधुन मुक्त वावर करणाऱ्या नक्षलवाद्यांचा मला कधी कधी खूप हेवा वाटतो. अम्मांचा (डॉ. राणी बंग) भेंडीकनारला कॅम्प आहे असं कळल्यावर मला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. कितीही घाबरलो तरी शेवटी वाघाच्या गुहेत डोकावून येण्याचं थ्रिल काही औरच आहे, नाही का?


(पोलिसांनी बसस्टॉप वर लावलेले पोस्टर)

आमची गाडी गडचिरोली-धानोरा राज्य महामार्गाला लागली आणि पहिल्याच बसस्टॉप वरच्या या पोस्टरने आमचे लक्ष वेधून घेतले. आजकाल पोलीसांनीसुद्धा नक्षलवाद्यांची ही पद्धत वापरायला सुरू केली आहे. पोस्टरमार्फत शत्रूविरूद्धचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे. मात्र हायवेपासून एटापल्लीच्या रोडला वळल की पोलिसांचे पोस्टर दिसेनासे होतात. मग नक्षलवाद्यांनी रस्त्यावर लिहिलेले संदेश दिसू लागतात. त्यांनी पाडलेले खांब दिसू लागतात. काही ठिकाणी झाड पाडून रस्ता आडवला जातो आणि लाल झेंड्यावर बंदचा फतवा असतो. नुकताच एक आठवड्याचा बंद पार पडल्यामुळे आम्ही जाऊ शकत होतो. बर या रस्त्याचा इतिहाससुद्धा पोटात गोळे आणणारा. रस्त्याच्या कॉंट्रॅक्टरचा नक्षलवाद्यांनी खून केल्यावर बॉर्डर रोड ऑर्गनायाझेशनला (BRO) या रस्त्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी रस्ता बांधला खरा, पण त्यांच्याही कमांडरला प्राण गमावावे लागले. पुढे एक गाव लागलं, ज्याच्या पाटलाचा नक्षलवाद्यांनी नुकताच खून केला होता. नंतर एक पोलीस स्टेशन लागले. त्याचाही अगदी चिरेबंद, कडेकोट बंदोबस्त. पोलीसही दहशतीतून सुटले नाही आहेत. रस्त्यात एका नक्षलवाद्याचं स्मारक होतं. अम्मांनी मला त्याचा फोटो काढायला सांगितला. मी खाली उतरलो खरा, पण एवढा इतिहास ऐकल्यावर पाय थरथर कापत होते. अम्मा मात्र स्थितप्रज्ञपणे माझ्याकडे बघून हसत होत्या.






(नक्षलवाद्यांचे संदेश आणि एक स्मारक)

इथल्या आदिवासींना अम्मांबद्दल प्रचंड जिव्हाळा आणि आदर आहे. त्यांनी अम्मांचं इतकं जोरदार स्वागत केलं की बस! त्यांच्या फाटक्या खिशांतून प्रेम भरभरून सांडत होतं. त्यांनी एक छानशी कमान बांधली होती. अम्मांनी खाली पाउल ठेवलं रे ठेवलं, त्यांची पारंपारिक वाद्ये आणि ताशे सुरू झाले. गोल करून तरूण नाचू लागले. मग सुवासिनींनी अम्मांच्या पायांवर पाणी ओतले. त्यांची पूजा केली. गावप्रवेश झाल्यावर तर वाद्यवृन्दाला मध्यात घेऊन तरुणांनी नाच सुरू केला. गावातल्या म्हतारल्या स्त्रिया आणि मुलीही तरूणांना मिळाल्या. त्यांने गोंडी भाषेतली गोड गाणी सुरू केली. नाचणाऱ्यांनी मस्त ठेका धरला. आम्हीही मग त्या नाचात सहभागी झालो. अम्मा या गोष्टींना सरावल्या असल्या तरी आम्हाला ते नवीन होतं. ते वातावरणच मंत्रमुग्ध करणारं होतं. बऱ्याच वेळ हे स्वागत सुरूच होतं हे पाहून गावातल्या जाणकार मंडळीनी गावकऱ्यांना थांबवले. अम्मांचा सत्कार झाला. अम्मांनी एक छोटंसं छानसं भाषण केलं. त्या छोट्याशा भाषणात गोष्टी होत्या, शिक्षकाची तळमळ होती, काही चुकीच्या समजुतींसाठी भरलेले रागेही होते. पण सर्वांनी ते खूप मनापासून आणि कौतुकाने ऐकलं. इतकं प्रेम लाभलेली ही साठीची बंगू बाई जगातल्या कुठल्याही भीतीपासून मुक्त होती. तिला परमेश्वराचे 'अभय' लाभले होते.





(अम्मांचं खूप जोरदार स्वागत करण्यात आलं.)

इनमीन पावणे दोनशेचं गाव ते. फार फार तर येडमपल्लीचे ५०-६० आदिवासी गावात आलेले. पण उत्साहाची कुठेच कमी नव्हती. प्राथमिक शाळेत कार्यक्रम तर इतके आयोजित केले होते की जमलेल्या गर्दीतला कोणताच माणूस सुटू नये. गावातल्या बायकांच्या स्त्रीरोगांवर उपचार, पुरूष व मुलांचीही तपासणी, बायकांच्या व मुलींच्या शर्यती आणि नंतर बक्षीस समारंभ, पुरुषांसाठीही 'तळ्यात-मळ्यात', 'डोळे झाकून ५० मीटर दूर डब्याचा काठीने अचूक वेध घेणे' इ. खेळ, कोणाला बोअर झालंच तर करमणुकीसाठी पपेट शो... गावातला कॉलेजला जायचा प्रयत्न केलेला एकमेव मुलगा सोबू आणि सर्चचे कार्यकर्ते सगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत होते, इकडून तिकडे पळत होते, गर्दीला हसवत हसवत खिळवून ठेवत होते. ठिकठिकाणी गुप्तरोग, एड्स, डब्बा (न्यूमोनिया), जन्तुदोष (सेप्सिस), मलेरिया, स्त्रियांचे कायदेशीर अधिकार, माहितीचा अधिकार, रोजगार हमी योजना, आदिवासींसाठी सरकारी योजना इ. गोष्टींबद्दल माहिती देणारी पोस्टर्स आणि व्यंगचित्रे लावली होती.




(ठिकठिकाणी वेगवेगळी माहिती देणारी पोस्टर्स व व्यंगचित्रे लावली होती.)

आमची जेवणाची सोय एका आदिवासी घरात केली होती. सगळ्या गावाने सर्चच्या कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी सामूहिक खर्च केला होता. भात आणि सांबार असे साधे पण चविष्ठ जेवण होते. याबाबतीत आम्ही लकी ठरलो, कारण बरेच दिवस पाळलेला एक मोर त्यांनी नुकताच अन्नाच्या अभावी मारून खाल्ला होता. जेवण झाल्यावर मेडिकल चेकअप सुरू झाले. आम्हाला त्यातलं काहीच ज्ञान नसल्यामुळे आम्ही गुपचुप जंगलाचा रस्ता धरला. हा रस्ता अजूनही मनात खोलवर जाउन बसला आहे. अत्यंत घनदाट असे जंगल. नक्षलवाद्यांच्या कृपेमुळे इकडे अजून खाणकाम सुरू झालेलं नाही की वृक्षतोडही झालेली नाही. जंगलात एक फारच सुंदर तलाव आहे. तलावात उड्या मारणारे हजारो बेडूक आहेत. चौफेर वृक्षराजीचे उमटलेले मोहक प्रतिबिंब आहे. भयाण पण हवीहवीशी वाटणारी शांतता आहे. मधूनच शांततेचा भंग करणारे विविध पक्ष्यांचे आवाज आहेत. कुठल्याही माणसाने हिप्नोटाईझ होऊन जावे असं हे जंगल आहे. इथल्या आदिवासींचं जंगलाशी खूप जवळचं नातं आहे. हे जंगल त्याचं पोट भरतं. जंगलातून ते मोहाची फुले व तेंदूपत्ता गोळा करतात. सीझनमध्ये या गोष्टी विकून त्याचं पोट भरतं. इतर वेळी ही गरज जंगलातले प्राणी पूर्ण करतात. अन्नासाठी प्राण्यांची शिकार होते. माकड हे त्याचं आवडतं खाद्य आहे. धनुष्य वापरण्याची त्यांची कला अतुलनीय आहे. तीन चारशे मीटर अंतरावरील ऐवज ते सहज टिपतात. आज या जंगलात फारसे वन्य प्राणी आढळत नाहीत. आपण शहरी लोक यासाठी आदिवासींना दोष देऊ शकतो, पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं आणि हेच इथले विदारक सत्य आहे.




आज या गावात वीज नाही. दहा वर्षांपासून वीजेचे पडलेले खांब कोणी दुरुस्तच केले नाहीत, किंवा दुरुस्त करायचं कोणाचं धाडस झालं नाही. सरकारी एस.टी. अति-दुर्मिळ आहे. संपूर्ण गावात मिळून एक मोबाईल फोन आहे पण टॉवरची रेंजच येत नाही. सर्पदंशासारखी काही इमर्जन्सी आली तर थोड्या फार शिकलेल्या सोबूला कित्येक मैलांची पायपीट करून टेकडीवर जावं लागतं. तिथे मोबाईलची रेंज येत असल्यामुळे तो सर्चमध्ये फोन करून ambulance मागवून घेतो. इथल्या लोकांचं विश्व बाहेरच्या जगापासून फार आयसोलेटेड आणि वेगळं आहे. सोबूने लाख सांगूनही ते लोक शिक्षणाला घाबरतात. त्यांना गोंडी भाषेतून तर शिक्षण कुठेच मिळत नाही. गावांत मांत्रिक आणि अंधश्रद्धांचा अंधाधुंद वावर आहे. आजही तेथे मासिक पाळी सुरू झाली की बाईला गावाबाहेरच्या घरात (कोर्मात) ठेवले जाते. बाईचे आरोग्य ही सर्वात दुर्लक्षित गोष्ट आहे. पुरूष जरी आजारी पडले तरी हे लोक दळणवळणाच्या सोयीअभावी दवाखान्यात येण्यासाठी करचतात. भारतातच लपलेले हे एक खूप वेगळे विश्व आहे आणि मला ते जवळून पहाण्याची संधी मिळाली होती.


कधीकधी कित्येक महिने आपल्या आयुष्यात काही घडतच नाही. कधीकधी फक्त अर्धा-एक दिवसही आपल्याला खूप काही सांगून जातो. मग या आठवणी कायमच्या मनात कोरल्या जातात. भेंडीकनार, तिथले अवलिया आदिवासी आणि त्याचं मोहक जंगल यांनी माझ्या मनाचा एक कोपरा कायमचा व्यापून टाकला आहे. त्या दिवशी 'जय सेवा' असा लोकांचा निरोप घेउन मी त्यांच्यातून वेगळा झालो खरा, पण ते लोक मात्र माझ्या मनातून वेगळे व्हायलाच तयार नाहीत.

-------------------------------------------------------------------------------------

काही स्मरणे...




(धनुष्य आणि मातीचे गोळे- त्यांचा पारंपारिक खेळ... खूप दूरवर ते अचूक नेम साधू शकतात.)


(कॉलेज पाहिलेला गावातला एकमेव मुलगा- सोबू)


(माणूस मेल्यावर त्याची आठवण म्हणून दगड उभा करतात. या दगडांची उंची वाढते असा त्यांचा समाज आहे.)


(प्रत्येक घरात कोंबडीला स्वतंत्र खुराडं आणि डुकरांना स्वतंत्र घर असते.)


(जय सेवा... निरोप)

- निखिल अनिल जोशी
गडचिरोली
२१-११-२०१०