Monday, 18 June 2012

सेवाग्राममधील एक संध्याकाळ

            स्वतः नायनांसोबत (डॉ. अभय बंग) गांधीजींचा सेवाग्राम आश्रम पाहण्याचं भाग्य मला मिळालं. नायनांचं बालपण वर्ध्याचं. बालपणीचे संस्कार सेवाग्राम आश्रमातील शाळेत घडले. पुढल्या आयुष्यात याच संस्कारांचा ठसा मनावर राहिला. गांधींच्या तत्त्वांवर आधारित असे थक्क करायला लावणारे काम उभे केले. मात्र माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला आपल्या उगमाबद्दल प्रचंड ओढ असते. सेवाग्राम आश्रम पाहून नायना थोडे हळवे झाले होते. कधीच आपल्या बालपणात बालपणात हरवून गेले होते. एरवी मोजके बोलणारे नायना तिथल्या प्रत्येक इमारत, प्रत्येक झाडाबद्दल भरभरून सांगत होते. मीही भारावून जावून ऐकत होतो, त्यांचा एकही शब्द पडू नये याची काळजी घेत होतो.
            शाळा, वसतीगृह, अतिथीगृह, महादेवभाई व बापूंचे कार्यालय पाहिल्यानंतर शेवटी जिची आतुरतेने वाट पाहत होतो ती बापूकुटी आली. कुटी बांधण्यापूर्वी गांधींनी दोन अटी घातल्या होत्या. एक, कुटी ५०० रुपयांच्या आता बनावी. दुसरी, कुटी बांधण्यासाठीसाठी आश्रमापासून ५ मैलाच्या परिसरात जे सामान मिळू शकते तेवढेच सामान वापरावे. एखाद्या सामान्य खेड्यापासून ५ मैलाच्या अंतरावर काय काय मिळू शकते? माती आणि लाकडे. केवळ माती व लाकडापासून अतिशय टुमदार व कौलारू कुटी बनवलेली आहे. कुठेही लोखंडाचा अथवा सिमेंटचा वापर करण्यात आलेला नाही. अगदी खिडक्यांचे गज व बीजागरीही बांबूपासून बनवलेले आहेत. कुठल्या मर्यादेपर्यंत आपल्या गरजा कमी करता येऊ शकतात त्याचे ही कुटी म्हणजे उत्तम उदाहरण आहे. आणि हो, साधेपणामुळे सौंदर्य कुठेच कमी झालेलं नाही. लाखो रुपयांच्या व हजारो मैल दूरच्या राजस्थानी टाईल्स, वरून मिरर पॉलिश, भिंतींना रासायनिक रंग अशा कोणत्याही आधुनिक घरापेक्षा स्वच्छ व सारवलेली कुटी मला लाखपटींनी सुंदर वाटते. आपण नेहमी ताज महाल बांधण्याच्या मागे लागलेलो असतो. तो बांधता बांधता मनावर ताणतणावाचे प्रचंड ओझे येते. तो बांधून झाल्यानंतर एवढा खर्चिक महाल जपता जपता पुन्हा नाकी नऊ येतात. बापूंच्या कुटीत मात्र जपण्यासारखे काहीच नव्हते. हां, इतक्या वर्षांनी परवा बापूंचा चष्मा चोरीला गेला. यावर पवानारचे श्री गोपाळ बजाज मोठ्या मार्मिकपणे म्हणाले 'चष्माच चोरीला गेला ना, बापूंची दृष्टी तर नाही गेली?'
            कुटीला कुंपणही बांबूचे होते, कुटीइतकेच सुंदर! कुंपणाबाहेर तीन भले मोठे दाट वृक्ष होते, दोन पिंपळाचे व एक बकुळाचा. पहिले पिंपळाचे झाड गांधी प्रथम सेवाग्रामला आले तेंव्हा लावले होते, तर दुसरे विनोबा भूदान यात्रा आटोपून परत आले तेंव्हा लावले होते. (त्यावेळी नायनाही विनोबांसोबत होते.) किती सुंदर कल्पना आहे celebration ची! झाड लावून! शेकडो वर्षे जगणाऱ्या झाडांच्या रूपाने तो क्षण अमर होऊन जातो. आपल्या आनंदाचा इतरांना त्रास नाही व पर्यावरणावरही कोणताच ताण नाही. बकुळाचे झाड कस्तुरबा गेल्या तेंव्हा लावले होते.  दुःखाला सामोरे कसे जावे ह्याचादेखील किती सुंदर मार्ग आहे! मृत्यूचा सामना नवीन जीवाच्या निर्मितीने! ते बकुळाचे झाड आज कस्तुरबांचे जिवंत स्मारक बनले आहे. (नाही तर आजकालचे नेते जिवंतपणी आणि स्वतःचेच भले मोठे पुतळे उभे करतात. हे पुतळे बनवण्याची प्रोसेस ही प्रचंड energy consuming व पर्यावरणाला मारक असते हा निराळाच मुद्दा!) सर्चमध्येदेखील दोन वृक्ष असेच आनंदाच्या क्षणी लावले गेले आहेत. एक वडाचे रोप, अम्मा-नायानांचे (डॉ. राणी व अभय बंग यांचे) गुरू कार्ल टेलर सर्चमध्ये आले होते तेंव्हा त्यांच्या हस्ते हॉस्पिटलजवळ लावण्यात आले होते. आज या वडाचा वटवृक्ष झाला आहे. सर्चच्या दवाखान्यात येणारे सर्व पेशंट्स त्याच्या सावलीत विश्रांती घेतात. दुसरे वडाचे रोप लावून तिबेटचे बौद्ध लामा रिम्पोचे यांच्या हस्ते अतिथीगृहाचे उद्घाटन झाले होते. आज हेदेखील झाड खूप मोठे झाले आहे.
      जी परंपरा गांधींनी सुरू केली, ती आपण चालू ठेवू शकतो का? एक सहज विचार मनात आला होता. आपल्या मित्र-मैत्रिणींना त्यांच्या वाढदिवसाला भेट म्हणून आपण एक रोप दिलं तर? वाढदिवस हे वाढीचे प्रतीक. वाढीसोबत जबाबदारी ही ओघानेच आली. पार्ट्या आणि इतर materialistic gifts देण्याऐवजी आपण एक रोप किमान एक वर्ष जगवण्याची जबाबदारी देऊ शकतो का? एका वनखात्याने किंवा काही ठराविक लोकांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या पर्यावरणाची काळजी घ्यावी त्यापेक्षा हा विकेंद्रीत मार्ग सोपा व सोयीस्कर नाही का? आम्ही सर्चमध्ये वाढदिवस हा झाडदिवस म्हणून साजरा करायचे ठरवले आहे. मित्र-मैत्रिणींना वाढदिवसाला भेट म्हणून झाड देण्याची प्रथा सुरू केली आहे.
      सेवाग्राममध्ये असेच आणखी एक झाड कधी काळी होते. कस्तुरबांच्या शेवटच्या काही दिवसांत गांधी त्यांच्यासोबत जेव्हा फिरायला जायचे, तेव्हा लवकरच बा थकून जायच्या. त्यासाठी गांधींनी एका झाडाभोवती चबुतरा बनवून घेतला होता. थकल्यानंतर बा त्या चबुतऱ्यावर थोडा वेळ विश्रांती घेत व पुन्हा चालू लागत. हे झाड मात्र आम्हाला दिसले नाही. नायनांना खूप हळहळ वाटली. मलाही खूप वाईट वाटले.
      एव्हाना अंधार पडू लागला होता. पाखरे आपापल्या झाडांवर परतत होती. आम्ही सेवाग्राम आश्रमाच्या बाहेर आलो. खारे शेंगदाणे विकणाऱ्या आजी घरी परतण्याची तयारी करत होत्यात्यांच्याकडून शेंगदाणे घेतले. नायना थोडेसे nostalgic झाले होते. परतण्याची वेळ तर झाली होती, पण पाउल मात्र निघत नव्हते. सचिन भाऊंना सुरू केलेली गाडी पुन्हा बंद करण्यास नायनांनी सांगितले. नायना मला घेऊन एका जुन्या इमारतीपाशी आले. तिची अवस्था पाहून ती वापरात नसावी हे कोणीही सांगितले असते. नायनांनी खुलासा केला. हे गांधीजींच्या काळात सुरू झालेले पोस्ट ऑफिस होते. गांधींना एका सर्वसामान्य खेड्यात एक सर्वसामान्य भारतीय बनून राहायचे होते. आश्रमात येण्यापूर्वी गांधींनी प्रथम गावकऱ्यांची परवानगी घेतली. सेवाग्रामला दळणवळण व संपर्काच्या काहीच सोयी नव्हत्या. मात्र व्हाईसरॉयला गांधींशी संपर्क साधता यावा म्हणून ब्रिटीश सरकारने लगेच टेलिफोन लाईन टाकली, पोस्ट ऑफिस बांधले. तीच ही पोस्टाची इमारत! याच इमारतीत रोज गांधींची लाखो पत्रे येत असतील! हेच पोस्ट ऑफिस पुढे बरीच वर्षे वापरात होते. नायना त्यांच्या लहानपणी रोज पोस्ट ऑफिसात जायचे. त्यांना तिकीटे जमवण्याचा छंद होता. पोस्टात कोणाकोणाची पत्रे येतात हे हेरून ठेवायचे व नंतर त्यांच्या घरी जाऊन पाकिटावरचे तिकीट मागायचे. एक पडकी इमारत अनेक आठवणींनी सजीव झाली होती. आज मात्र याच इमारतीशेजारी मोठे, दुमजली नवे पोस्ट ऑफिस बांधण्यात आले आहे.
      आश्रमाच्या बाहेर रचनवादी काम करणाऱ्या विवाहित जोडप्यांसाठी घरे बांधण्यात आली होती. आपले लहानपणीचे घर दाखवण्यासाठी नायना तिकडे घेऊन गेले. काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या होत्या. घरात राहणारेदेखील बदलले होते. पण घराबाहेरचे तुळशी वृंदावन मात्र अजूनही तसेच होते. एका बारीकशा पणतीच्या मंद प्रकाशात ते उजळून निघाले होते. मन प्रसन्न झाले. तिथल्या शांततेत आणि पणतीच्या मंद प्रकाशात अशी काय जादू होती? मला वाटते मन आनंदी राहण्यासाठी साध्या व छोट्या गोष्टी पुरेशा असतात. मात्र बाहेरून आपल्यावर सदैव झगमगाटाचा भडीमार केला जातो. मग आपल्याला मोठमोठे हॅलोजनचे दिवे व डॉल्बीशिवाय आनंदच मिळत नाही, मोठा आवाज करणारे फटाकेच उडवल्याशिवाय चैन पडत नाही, टीव्हीवरच्या अती नाटकी मालिका व सनसनाटी बातम्याच न पाहू तर जीवाची तगमग होते. नाजूक व तरल गोष्टींना प्रतिसाद द्यायची आपली क्षमताच संपून चाललीय की काय अशी कधीकधी भीती वाटते.
      या भारावलेल्या वातावरणात फोटो काढायचा मोह बऱ्याचदा झाला. मोठ्या कष्टाने हात आवरला. काही गोष्टी व काही क्षण मनात नेहमीच ताजे राहतात. आपण बळजबरीने त्यांना कृत्रिमरित्या साठवायचा प्रयत्न करतो व समोर प्रत्यक्ष जे सौंदर्य दिसत आहे ते मात्र पहायला विसरतो. एखाद्या तबलजीचे हात थिरकायला लागल्यावर आपण उत्साहाच्या भरात टाळ्या वाजवाव्यात व टाळ्यांच्या गोंधळात नेमकी सम हरवून जावी असेच काहीसे आयुष्यात घडत असते.
      जाता जाता नायना भावपूर्ण होऊन म्हणाले, “असं वाटतं की वर्षातले किमान १५ दिवस सर्व काही सोडून सेवाग्राममध्ये राहायला यावे.” आयुष्यभर नायनांनी गांधींची निर्गुण भक्ती केली. गांधींनी दाखवलेल्या कठोर कर्मयोगाच्या मार्गावर न थकता चालत राहिले. थक्क करून सोडेल इतके मोठे काम त्यांनी उभे केले. पण तरीही त्यांच्या मनात असणारी आपल्या उगमाबद्दलची ओढ सारखी जाणवत राहते. त्यांच्याकडे पाहून वाटतं कर्मयोगाला संवेदनशीलतेची वा भक्तीची जोड मिळते, निर्गुणाला सगुणाची जोड मिळते तेव्हा उभं आयुष्य बहरल्याशिवाय राहत नाही.

-        निखिल जोशी
गडचिरोली
२९ एप्रिल, २०१२