Monday 22 November 2010

भेंडीकनार (गडचिरोली)



भेंडीकनार, गडचिरोली जिल्ह्यातल्या घनदाट अरण्यात वसलेलं एक आदिवासी गाव. गाव इतकं रानात आहे की ऐन थंडीत घाम फुटावा. पण जितकं भीतीदायक तेवढंच, किंबहुना काकणभर अधिकच सुंदर. भीतीदायक एवढ्यासाठी जंगली श्वापादांसोबत नक्षलवाद्यांच्या गोळीचाही इकडे सहज वावर आहे. अशा गावांमधुन मुक्त वावर करणाऱ्या नक्षलवाद्यांचा मला कधी कधी खूप हेवा वाटतो. अम्मांचा (डॉ. राणी बंग) भेंडीकनारला कॅम्प आहे असं कळल्यावर मला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. कितीही घाबरलो तरी शेवटी वाघाच्या गुहेत डोकावून येण्याचं थ्रिल काही औरच आहे, नाही का?


(पोलिसांनी बसस्टॉप वर लावलेले पोस्टर)

आमची गाडी गडचिरोली-धानोरा राज्य महामार्गाला लागली आणि पहिल्याच बसस्टॉप वरच्या या पोस्टरने आमचे लक्ष वेधून घेतले. आजकाल पोलीसांनीसुद्धा नक्षलवाद्यांची ही पद्धत वापरायला सुरू केली आहे. पोस्टरमार्फत शत्रूविरूद्धचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे. मात्र हायवेपासून एटापल्लीच्या रोडला वळल की पोलिसांचे पोस्टर दिसेनासे होतात. मग नक्षलवाद्यांनी रस्त्यावर लिहिलेले संदेश दिसू लागतात. त्यांनी पाडलेले खांब दिसू लागतात. काही ठिकाणी झाड पाडून रस्ता आडवला जातो आणि लाल झेंड्यावर बंदचा फतवा असतो. नुकताच एक आठवड्याचा बंद पार पडल्यामुळे आम्ही जाऊ शकत होतो. बर या रस्त्याचा इतिहाससुद्धा पोटात गोळे आणणारा. रस्त्याच्या कॉंट्रॅक्टरचा नक्षलवाद्यांनी खून केल्यावर बॉर्डर रोड ऑर्गनायाझेशनला (BRO) या रस्त्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी रस्ता बांधला खरा, पण त्यांच्याही कमांडरला प्राण गमावावे लागले. पुढे एक गाव लागलं, ज्याच्या पाटलाचा नक्षलवाद्यांनी नुकताच खून केला होता. नंतर एक पोलीस स्टेशन लागले. त्याचाही अगदी चिरेबंद, कडेकोट बंदोबस्त. पोलीसही दहशतीतून सुटले नाही आहेत. रस्त्यात एका नक्षलवाद्याचं स्मारक होतं. अम्मांनी मला त्याचा फोटो काढायला सांगितला. मी खाली उतरलो खरा, पण एवढा इतिहास ऐकल्यावर पाय थरथर कापत होते. अम्मा मात्र स्थितप्रज्ञपणे माझ्याकडे बघून हसत होत्या.






(नक्षलवाद्यांचे संदेश आणि एक स्मारक)

इथल्या आदिवासींना अम्मांबद्दल प्रचंड जिव्हाळा आणि आदर आहे. त्यांनी अम्मांचं इतकं जोरदार स्वागत केलं की बस! त्यांच्या फाटक्या खिशांतून प्रेम भरभरून सांडत होतं. त्यांनी एक छानशी कमान बांधली होती. अम्मांनी खाली पाउल ठेवलं रे ठेवलं, त्यांची पारंपारिक वाद्ये आणि ताशे सुरू झाले. गोल करून तरूण नाचू लागले. मग सुवासिनींनी अम्मांच्या पायांवर पाणी ओतले. त्यांची पूजा केली. गावप्रवेश झाल्यावर तर वाद्यवृन्दाला मध्यात घेऊन तरुणांनी नाच सुरू केला. गावातल्या म्हतारल्या स्त्रिया आणि मुलीही तरूणांना मिळाल्या. त्यांने गोंडी भाषेतली गोड गाणी सुरू केली. नाचणाऱ्यांनी मस्त ठेका धरला. आम्हीही मग त्या नाचात सहभागी झालो. अम्मा या गोष्टींना सरावल्या असल्या तरी आम्हाला ते नवीन होतं. ते वातावरणच मंत्रमुग्ध करणारं होतं. बऱ्याच वेळ हे स्वागत सुरूच होतं हे पाहून गावातल्या जाणकार मंडळीनी गावकऱ्यांना थांबवले. अम्मांचा सत्कार झाला. अम्मांनी एक छोटंसं छानसं भाषण केलं. त्या छोट्याशा भाषणात गोष्टी होत्या, शिक्षकाची तळमळ होती, काही चुकीच्या समजुतींसाठी भरलेले रागेही होते. पण सर्वांनी ते खूप मनापासून आणि कौतुकाने ऐकलं. इतकं प्रेम लाभलेली ही साठीची बंगू बाई जगातल्या कुठल्याही भीतीपासून मुक्त होती. तिला परमेश्वराचे 'अभय' लाभले होते.





(अम्मांचं खूप जोरदार स्वागत करण्यात आलं.)

इनमीन पावणे दोनशेचं गाव ते. फार फार तर येडमपल्लीचे ५०-६० आदिवासी गावात आलेले. पण उत्साहाची कुठेच कमी नव्हती. प्राथमिक शाळेत कार्यक्रम तर इतके आयोजित केले होते की जमलेल्या गर्दीतला कोणताच माणूस सुटू नये. गावातल्या बायकांच्या स्त्रीरोगांवर उपचार, पुरूष व मुलांचीही तपासणी, बायकांच्या व मुलींच्या शर्यती आणि नंतर बक्षीस समारंभ, पुरुषांसाठीही 'तळ्यात-मळ्यात', 'डोळे झाकून ५० मीटर दूर डब्याचा काठीने अचूक वेध घेणे' इ. खेळ, कोणाला बोअर झालंच तर करमणुकीसाठी पपेट शो... गावातला कॉलेजला जायचा प्रयत्न केलेला एकमेव मुलगा सोबू आणि सर्चचे कार्यकर्ते सगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत होते, इकडून तिकडे पळत होते, गर्दीला हसवत हसवत खिळवून ठेवत होते. ठिकठिकाणी गुप्तरोग, एड्स, डब्बा (न्यूमोनिया), जन्तुदोष (सेप्सिस), मलेरिया, स्त्रियांचे कायदेशीर अधिकार, माहितीचा अधिकार, रोजगार हमी योजना, आदिवासींसाठी सरकारी योजना इ. गोष्टींबद्दल माहिती देणारी पोस्टर्स आणि व्यंगचित्रे लावली होती.




(ठिकठिकाणी वेगवेगळी माहिती देणारी पोस्टर्स व व्यंगचित्रे लावली होती.)

आमची जेवणाची सोय एका आदिवासी घरात केली होती. सगळ्या गावाने सर्चच्या कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी सामूहिक खर्च केला होता. भात आणि सांबार असे साधे पण चविष्ठ जेवण होते. याबाबतीत आम्ही लकी ठरलो, कारण बरेच दिवस पाळलेला एक मोर त्यांनी नुकताच अन्नाच्या अभावी मारून खाल्ला होता. जेवण झाल्यावर मेडिकल चेकअप सुरू झाले. आम्हाला त्यातलं काहीच ज्ञान नसल्यामुळे आम्ही गुपचुप जंगलाचा रस्ता धरला. हा रस्ता अजूनही मनात खोलवर जाउन बसला आहे. अत्यंत घनदाट असे जंगल. नक्षलवाद्यांच्या कृपेमुळे इकडे अजून खाणकाम सुरू झालेलं नाही की वृक्षतोडही झालेली नाही. जंगलात एक फारच सुंदर तलाव आहे. तलावात उड्या मारणारे हजारो बेडूक आहेत. चौफेर वृक्षराजीचे उमटलेले मोहक प्रतिबिंब आहे. भयाण पण हवीहवीशी वाटणारी शांतता आहे. मधूनच शांततेचा भंग करणारे विविध पक्ष्यांचे आवाज आहेत. कुठल्याही माणसाने हिप्नोटाईझ होऊन जावे असं हे जंगल आहे. इथल्या आदिवासींचं जंगलाशी खूप जवळचं नातं आहे. हे जंगल त्याचं पोट भरतं. जंगलातून ते मोहाची फुले व तेंदूपत्ता गोळा करतात. सीझनमध्ये या गोष्टी विकून त्याचं पोट भरतं. इतर वेळी ही गरज जंगलातले प्राणी पूर्ण करतात. अन्नासाठी प्राण्यांची शिकार होते. माकड हे त्याचं आवडतं खाद्य आहे. धनुष्य वापरण्याची त्यांची कला अतुलनीय आहे. तीन चारशे मीटर अंतरावरील ऐवज ते सहज टिपतात. आज या जंगलात फारसे वन्य प्राणी आढळत नाहीत. आपण शहरी लोक यासाठी आदिवासींना दोष देऊ शकतो, पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं आणि हेच इथले विदारक सत्य आहे.




आज या गावात वीज नाही. दहा वर्षांपासून वीजेचे पडलेले खांब कोणी दुरुस्तच केले नाहीत, किंवा दुरुस्त करायचं कोणाचं धाडस झालं नाही. सरकारी एस.टी. अति-दुर्मिळ आहे. संपूर्ण गावात मिळून एक मोबाईल फोन आहे पण टॉवरची रेंजच येत नाही. सर्पदंशासारखी काही इमर्जन्सी आली तर थोड्या फार शिकलेल्या सोबूला कित्येक मैलांची पायपीट करून टेकडीवर जावं लागतं. तिथे मोबाईलची रेंज येत असल्यामुळे तो सर्चमध्ये फोन करून ambulance मागवून घेतो. इथल्या लोकांचं विश्व बाहेरच्या जगापासून फार आयसोलेटेड आणि वेगळं आहे. सोबूने लाख सांगूनही ते लोक शिक्षणाला घाबरतात. त्यांना गोंडी भाषेतून तर शिक्षण कुठेच मिळत नाही. गावांत मांत्रिक आणि अंधश्रद्धांचा अंधाधुंद वावर आहे. आजही तेथे मासिक पाळी सुरू झाली की बाईला गावाबाहेरच्या घरात (कोर्मात) ठेवले जाते. बाईचे आरोग्य ही सर्वात दुर्लक्षित गोष्ट आहे. पुरूष जरी आजारी पडले तरी हे लोक दळणवळणाच्या सोयीअभावी दवाखान्यात येण्यासाठी करचतात. भारतातच लपलेले हे एक खूप वेगळे विश्व आहे आणि मला ते जवळून पहाण्याची संधी मिळाली होती.


कधीकधी कित्येक महिने आपल्या आयुष्यात काही घडतच नाही. कधीकधी फक्त अर्धा-एक दिवसही आपल्याला खूप काही सांगून जातो. मग या आठवणी कायमच्या मनात कोरल्या जातात. भेंडीकनार, तिथले अवलिया आदिवासी आणि त्याचं मोहक जंगल यांनी माझ्या मनाचा एक कोपरा कायमचा व्यापून टाकला आहे. त्या दिवशी 'जय सेवा' असा लोकांचा निरोप घेउन मी त्यांच्यातून वेगळा झालो खरा, पण ते लोक मात्र माझ्या मनातून वेगळे व्हायलाच तयार नाहीत.

-------------------------------------------------------------------------------------

काही स्मरणे...




(धनुष्य आणि मातीचे गोळे- त्यांचा पारंपारिक खेळ... खूप दूरवर ते अचूक नेम साधू शकतात.)


(कॉलेज पाहिलेला गावातला एकमेव मुलगा- सोबू)


(माणूस मेल्यावर त्याची आठवण म्हणून दगड उभा करतात. या दगडांची उंची वाढते असा त्यांचा समाज आहे.)


(प्रत्येक घरात कोंबडीला स्वतंत्र खुराडं आणि डुकरांना स्वतंत्र घर असते.)


(जय सेवा... निरोप)

- निखिल अनिल जोशी
गडचिरोली
२१-११-२०१०

Monday 2 August 2010

अनंतगिरी



हैदराबादच्या गजबजाटापासून दूर, थोडसं पश्चिमेला, अजूनही 'हिल स्टेशन' किंवा 'पिकनिक स्पॉट' न झालेलं, अनंतागिरी नावाचं एक गोंडस ठिकाण आहे. गेल्या उन्हाळ्यातच माझ्यावर अनंतगिरीने मोहिनी टाकली होती. एक छोटीशी टेकडी... तिच्याकडे जाणारा तिच्या एवढाच सुंदर रस्ता... वर पद्मनाभाचं स्वयंभू मंदिर... मंदिराच्या मागे खाली उतरणारी स्वप्नामधल्या गावात जाणारी पायवाट... भोवताली गच्च जंगल, इतकं घनदाट की त्यामधून रस्ता शोधायला लागावा... नाना प्रकारचे कुठल्याशा झाडावर लपलेले पक्षी, आणि उन्हाच्या तिरीपेप्रमाणेच सुखद धक्का देणारी त्यांची मंजुळ मधुर शीळ... ते सगळंच अद्भुत होतं.



आज पावसाळ्यात लंकेच्या पार्वतीला जणू साज चढला होता. तेव्हा गळालेली पाने आज आषाढसरींना झेलून थरारून उठली होती. जंगलातल्या ओढ्याला पाझर फुटला होता. नजर पोहोचेल तोपर्यंत हिरव्याचं साम्राज्य आजूबाजूची राज्यं खालसा करण्यात गुंतलं होतं. जंगलाच्या मध्यभागी एक टेकडी आहे. निसरड्या वाटेमुळे चढायला थोडीशी कठीण. पण एकदा चढून गेलं की ३६० अंशात कुठेही पाहिलं तरी दूरवरच्या डोंगरांनी कुंपण घातलेले जंगल. तिथं पोचल्यावर 'याजसाठी केला होता अट्टाहास' असं वाटल्याशिवाय राहत नाही. या जंगलातली झाडं पण अद्भुत, उंचच्या उंच Eukaliptus पासून छोटी छोटी काटेरी झुडुपे, भरदार खोडांच्या गंभीर वटवृक्षापासून चंचल हेलकावणाऱ्या वेली. फुलपाखरे तर इतक्या प्रकारची दिसली म्हणून सांगू! घाणेरीच्या फुलांवर मनसोक्त बागडायची. फुलपाखराचा स्वभाव फारच चंचल. एवढसं शरीर, पण सारखं इकडून तिकडे उडत असतं. त्याची trajectory पण फारच सुरेख असते. एकदा त्याला आपल्या आवडीचं फूल मिळालं की बास. कितीही जवळ जाऊन फोटो काढा. ते तुम्हाला आजिबात भाव देत नाही. घाबरत तर मुळीच नाही. मला फुलपाखराचा फार हेवा वाटतो.

















दुपारभर मनसोक्त भटकून परतीच्या वाटेला लागलो. मंदिर जसजसं जवळ येउ लागलं तसतशी गुटख्याची पाकिटे, प्लास्टिकच्या बाटल्या दिसू लागल्या. एका झाडावर चढून बेधुंद झालेली मुले 'जय तेलंगणा'च्या घोषणा देत होती, नव्हे, केकाटत होती. त्यांच्या घोषणा ऐकायला तिथे कोणी माणूस तर नव्हता, पक्षी मात्र नक्कीच घाबरून आंध्राच्या बाजूला पळून गेले असतील. प्रसन्न झालेलं माझं मन थोडंसं खिन्न झालं. वर चढून मंदिरापाशी आलो. मघाशी नजरेतून चुकलेला एक बोर्ड डोळ्यांसमोर आला आणि उरलंसुरलं अवसान गळून पडलं- "Anantgiri Hill Resort, Opening shortly".