Monday, 22 November 2010
भेंडीकनार (गडचिरोली)
भेंडीकनार, गडचिरोली जिल्ह्यातल्या घनदाट अरण्यात वसलेलं एक आदिवासी गाव. गाव इतकं रानात आहे की ऐन थंडीत घाम फुटावा. पण जितकं भीतीदायक तेवढंच, किंबहुना काकणभर अधिकच सुंदर. भीतीदायक एवढ्यासाठी जंगली श्वापादांसोबत नक्षलवाद्यांच्या गोळीचाही इकडे सहज वावर आहे. अशा गावांमधुन मुक्त वावर करणाऱ्या नक्षलवाद्यांचा मला कधी कधी खूप हेवा वाटतो. अम्मांचा (डॉ. राणी बंग) भेंडीकनारला कॅम्प आहे असं कळल्यावर मला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. कितीही घाबरलो तरी शेवटी वाघाच्या गुहेत डोकावून येण्याचं थ्रिल काही औरच आहे, नाही का?
(पोलिसांनी बसस्टॉप वर लावलेले पोस्टर)
आमची गाडी गडचिरोली-धानोरा राज्य महामार्गाला लागली आणि पहिल्याच बसस्टॉप वरच्या या पोस्टरने आमचे लक्ष वेधून घेतले. आजकाल पोलीसांनीसुद्धा नक्षलवाद्यांची ही पद्धत वापरायला सुरू केली आहे. पोस्टरमार्फत शत्रूविरूद्धचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे. मात्र हायवेपासून एटापल्लीच्या रोडला वळल की पोलिसांचे पोस्टर दिसेनासे होतात. मग नक्षलवाद्यांनी रस्त्यावर लिहिलेले संदेश दिसू लागतात. त्यांनी पाडलेले खांब दिसू लागतात. काही ठिकाणी झाड पाडून रस्ता आडवला जातो आणि लाल झेंड्यावर बंदचा फतवा असतो. नुकताच एक आठवड्याचा बंद पार पडल्यामुळे आम्ही जाऊ शकत होतो. बर या रस्त्याचा इतिहाससुद्धा पोटात गोळे आणणारा. रस्त्याच्या कॉंट्रॅक्टरचा नक्षलवाद्यांनी खून केल्यावर बॉर्डर रोड ऑर्गनायाझेशनला (BRO) या रस्त्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी रस्ता बांधला खरा, पण त्यांच्याही कमांडरला प्राण गमावावे लागले. पुढे एक गाव लागलं, ज्याच्या पाटलाचा नक्षलवाद्यांनी नुकताच खून केला होता. नंतर एक पोलीस स्टेशन लागले. त्याचाही अगदी चिरेबंद, कडेकोट बंदोबस्त. पोलीसही दहशतीतून सुटले नाही आहेत. रस्त्यात एका नक्षलवाद्याचं स्मारक होतं. अम्मांनी मला त्याचा फोटो काढायला सांगितला. मी खाली उतरलो खरा, पण एवढा इतिहास ऐकल्यावर पाय थरथर कापत होते. अम्मा मात्र स्थितप्रज्ञपणे माझ्याकडे बघून हसत होत्या.
(नक्षलवाद्यांचे संदेश आणि एक स्मारक)
इथल्या आदिवासींना अम्मांबद्दल प्रचंड जिव्हाळा आणि आदर आहे. त्यांनी अम्मांचं इतकं जोरदार स्वागत केलं की बस! त्यांच्या फाटक्या खिशांतून प्रेम भरभरून सांडत होतं. त्यांनी एक छानशी कमान बांधली होती. अम्मांनी खाली पाउल ठेवलं रे ठेवलं, त्यांची पारंपारिक वाद्ये आणि ताशे सुरू झाले. गोल करून तरूण नाचू लागले. मग सुवासिनींनी अम्मांच्या पायांवर पाणी ओतले. त्यांची पूजा केली. गावप्रवेश झाल्यावर तर वाद्यवृन्दाला मध्यात घेऊन तरुणांनी नाच सुरू केला. गावातल्या म्हतारल्या स्त्रिया आणि मुलीही तरूणांना मिळाल्या. त्यांने गोंडी भाषेतली गोड गाणी सुरू केली. नाचणाऱ्यांनी मस्त ठेका धरला. आम्हीही मग त्या नाचात सहभागी झालो. अम्मा या गोष्टींना सरावल्या असल्या तरी आम्हाला ते नवीन होतं. ते वातावरणच मंत्रमुग्ध करणारं होतं. बऱ्याच वेळ हे स्वागत सुरूच होतं हे पाहून गावातल्या जाणकार मंडळीनी गावकऱ्यांना थांबवले. अम्मांचा सत्कार झाला. अम्मांनी एक छोटंसं छानसं भाषण केलं. त्या छोट्याशा भाषणात गोष्टी होत्या, शिक्षकाची तळमळ होती, काही चुकीच्या समजुतींसाठी भरलेले रागेही होते. पण सर्वांनी ते खूप मनापासून आणि कौतुकाने ऐकलं. इतकं प्रेम लाभलेली ही साठीची बंगू बाई जगातल्या कुठल्याही भीतीपासून मुक्त होती. तिला परमेश्वराचे 'अभय' लाभले होते.
(अम्मांचं खूप जोरदार स्वागत करण्यात आलं.)
इनमीन पावणे दोनशेचं गाव ते. फार फार तर येडमपल्लीचे ५०-६० आदिवासी गावात आलेले. पण उत्साहाची कुठेच कमी नव्हती. प्राथमिक शाळेत कार्यक्रम तर इतके आयोजित केले होते की जमलेल्या गर्दीतला कोणताच माणूस सुटू नये. गावातल्या बायकांच्या स्त्रीरोगांवर उपचार, पुरूष व मुलांचीही तपासणी, बायकांच्या व मुलींच्या शर्यती आणि नंतर बक्षीस समारंभ, पुरुषांसाठीही 'तळ्यात-मळ्यात', 'डोळे झाकून ५० मीटर दूर डब्याचा काठीने अचूक वेध घेणे' इ. खेळ, कोणाला बोअर झालंच तर करमणुकीसाठी पपेट शो... गावातला कॉलेजला जायचा प्रयत्न केलेला एकमेव मुलगा सोबू आणि सर्चचे कार्यकर्ते सगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत होते, इकडून तिकडे पळत होते, गर्दीला हसवत हसवत खिळवून ठेवत होते. ठिकठिकाणी गुप्तरोग, एड्स, डब्बा (न्यूमोनिया), जन्तुदोष (सेप्सिस), मलेरिया, स्त्रियांचे कायदेशीर अधिकार, माहितीचा अधिकार, रोजगार हमी योजना, आदिवासींसाठी सरकारी योजना इ. गोष्टींबद्दल माहिती देणारी पोस्टर्स आणि व्यंगचित्रे लावली होती.
(ठिकठिकाणी वेगवेगळी माहिती देणारी पोस्टर्स व व्यंगचित्रे लावली होती.)
आमची जेवणाची सोय एका आदिवासी घरात केली होती. सगळ्या गावाने सर्चच्या कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी सामूहिक खर्च केला होता. भात आणि सांबार असे साधे पण चविष्ठ जेवण होते. याबाबतीत आम्ही लकी ठरलो, कारण बरेच दिवस पाळलेला एक मोर त्यांनी नुकताच अन्नाच्या अभावी मारून खाल्ला होता. जेवण झाल्यावर मेडिकल चेकअप सुरू झाले. आम्हाला त्यातलं काहीच ज्ञान नसल्यामुळे आम्ही गुपचुप जंगलाचा रस्ता धरला. हा रस्ता अजूनही मनात खोलवर जाउन बसला आहे. अत्यंत घनदाट असे जंगल. नक्षलवाद्यांच्या कृपेमुळे इकडे अजून खाणकाम सुरू झालेलं नाही की वृक्षतोडही झालेली नाही. जंगलात एक फारच सुंदर तलाव आहे. तलावात उड्या मारणारे हजारो बेडूक आहेत. चौफेर वृक्षराजीचे उमटलेले मोहक प्रतिबिंब आहे. भयाण पण हवीहवीशी वाटणारी शांतता आहे. मधूनच शांततेचा भंग करणारे विविध पक्ष्यांचे आवाज आहेत. कुठल्याही माणसाने हिप्नोटाईझ होऊन जावे असं हे जंगल आहे. इथल्या आदिवासींचं जंगलाशी खूप जवळचं नातं आहे. हे जंगल त्याचं पोट भरतं. जंगलातून ते मोहाची फुले व तेंदूपत्ता गोळा करतात. सीझनमध्ये या गोष्टी विकून त्याचं पोट भरतं. इतर वेळी ही गरज जंगलातले प्राणी पूर्ण करतात. अन्नासाठी प्राण्यांची शिकार होते. माकड हे त्याचं आवडतं खाद्य आहे. धनुष्य वापरण्याची त्यांची कला अतुलनीय आहे. तीन चारशे मीटर अंतरावरील ऐवज ते सहज टिपतात. आज या जंगलात फारसे वन्य प्राणी आढळत नाहीत. आपण शहरी लोक यासाठी आदिवासींना दोष देऊ शकतो, पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं आणि हेच इथले विदारक सत्य आहे.
आज या गावात वीज नाही. दहा वर्षांपासून वीजेचे पडलेले खांब कोणी दुरुस्तच केले नाहीत, किंवा दुरुस्त करायचं कोणाचं धाडस झालं नाही. सरकारी एस.टी. अति-दुर्मिळ आहे. संपूर्ण गावात मिळून एक मोबाईल फोन आहे पण टॉवरची रेंजच येत नाही. सर्पदंशासारखी काही इमर्जन्सी आली तर थोड्या फार शिकलेल्या सोबूला कित्येक मैलांची पायपीट करून टेकडीवर जावं लागतं. तिथे मोबाईलची रेंज येत असल्यामुळे तो सर्चमध्ये फोन करून ambulance मागवून घेतो. इथल्या लोकांचं विश्व बाहेरच्या जगापासून फार आयसोलेटेड आणि वेगळं आहे. सोबूने लाख सांगूनही ते लोक शिक्षणाला घाबरतात. त्यांना गोंडी भाषेतून तर शिक्षण कुठेच मिळत नाही. गावांत मांत्रिक आणि अंधश्रद्धांचा अंधाधुंद वावर आहे. आजही तेथे मासिक पाळी सुरू झाली की बाईला गावाबाहेरच्या घरात (कोर्मात) ठेवले जाते. बाईचे आरोग्य ही सर्वात दुर्लक्षित गोष्ट आहे. पुरूष जरी आजारी पडले तरी हे लोक दळणवळणाच्या सोयीअभावी दवाखान्यात येण्यासाठी करचतात. भारतातच लपलेले हे एक खूप वेगळे विश्व आहे आणि मला ते जवळून पहाण्याची संधी मिळाली होती.
कधीकधी कित्येक महिने आपल्या आयुष्यात काही घडतच नाही. कधीकधी फक्त अर्धा-एक दिवसही आपल्याला खूप काही सांगून जातो. मग या आठवणी कायमच्या मनात कोरल्या जातात. भेंडीकनार, तिथले अवलिया आदिवासी आणि त्याचं मोहक जंगल यांनी माझ्या मनाचा एक कोपरा कायमचा व्यापून टाकला आहे. त्या दिवशी 'जय सेवा' असा लोकांचा निरोप घेउन मी त्यांच्यातून वेगळा झालो खरा, पण ते लोक मात्र माझ्या मनातून वेगळे व्हायलाच तयार नाहीत.
-------------------------------------------------------------------------------------
काही स्मरणे...
(धनुष्य आणि मातीचे गोळे- त्यांचा पारंपारिक खेळ... खूप दूरवर ते अचूक नेम साधू शकतात.)
(कॉलेज पाहिलेला गावातला एकमेव मुलगा- सोबू)
(माणूस मेल्यावर त्याची आठवण म्हणून दगड उभा करतात. या दगडांची उंची वाढते असा त्यांचा समाज आहे.)
(प्रत्येक घरात कोंबडीला स्वतंत्र खुराडं आणि डुकरांना स्वतंत्र घर असते.)
(जय सेवा... निरोप)
- निखिल अनिल जोशी
गडचिरोली
२१-११-२०१०
Labels:
Bhendikanar,
Dhanora,
Gadchiroli
Subscribe to:
Post Comments (Atom)
wah barukkhan! ekdam jhakas description kelass.. aaplyala tar heva waaTayla lagla rao tuza...
ReplyDeletebaarkya, sahi re... chan lihila aahes... jagatoysa leka tu...
ReplyDeleteसहीरे निख्या पुन्हा भेंडीकनारला जाऊन आल्यासारखं वाटलं...
ReplyDeleteनिखिल,खुपच छान, तू आरोग्य कॅम्पच शब्दरुपाने अनुभवयाला दिला... तुझी चौफेर फिरणारी नजर आणि त्या मागचे सुसूत्रीत विचार चक्र... सर्वच छान
ReplyDeleteअसाच...लिहीत राहा.
take care mitra
ReplyDeleteकधीकधी कित्येक महिने आपल्या आयुष्यात काही घडतच नाही. कधीकधी फक्त अर्धा-एक दिवसही आपल्याला खूप काही सांगून जातो.
ReplyDeleteekdum barobar .....
cool blog.. i will start improving my marathi to read it.
ReplyDeletekhup chan ...
ReplyDeleteपाण्यात दगड पडतो ...
ReplyDeleteक्षणभर तरंग उठतात ... आणि विरून जातात ...
पाणी पुन्हा पाहिल्यासारखं ...
स्तब्ध ... स्वताला स्थितप्रज्ञ म्हणवणार ...
पण मघाचे ते तरंग पाण्याला त्याच्या अचलतेची जाणीव करून देतात ...
आणि मग ती जाणीव खायला उठते ...
आपण इतके निश्चल कसे ...??
Mastch re! Tuzya blog madhun amhala ashich vegvegalya thikaNachi safar ghadvat raha..
ReplyDeletetuzya blog madhun wegLach ek jag baghayla miLala ...
ReplyDeletemast lihlas re barkya...
ReplyDeleteagadi Bendikagar la jaun alya sarakhe vatale....
khup masta discribe kela aahe khup chaan
ReplyDeletekhup sahi....malatar gavkaryani ammache kelele swagat kup awadle...bhartachi sanskruti disli...
ReplyDeleteani tula alela anubhav tu asa mandla ahe ki dolyasamor chitra smaranrupi kayamswarupi tarangun jaatat..
khup sahi....tula bhetayla aavdel mala...
ranajit.londhe@gmail....
hum log hai aise diwane...
duniya ko badal kar manenge....
by likhte raho
Dear Nikhil, The discription is just beautiful. It depicts your feelings and reflections very genuinely. I have experienced the same thing during my two years stay in SEARCH. Its nice to see those people almost worshiping Amma, there are millions of reasons for that. Keep writing. Have you heard Najuk Dada's "Vaayeni sanga vaayeni..." gondi song? you will surely like it . He is weired in many sense :). The pics are beautiful. There is one suggession about the "Naxal" part.the sentence ""भिऊ नकोस. जोपर्यंत मी ..... होणार नाही." should be used carefully before publishing it as a block or an article.
ReplyDeletewill talk soon.
:)
Pawan
निखिल, हा लेख लिहिल्याबद्दल खूप आभार! नजरेआडचं , ऐकीव जग - कधीमधी थोरामोठ्यांच्या लेखांमधून समोर येतं आणि तितक्याच सहज विसरूनही टाकलं जातं. पण मित्राने गप्पा मारताना एखादा अनुभव सांगावा तितक्या सहज, फोटोंसकट तू हे लिहिलंयस - आता भारतात आल्यावर शोधग्रामात आलंच पाहिजे इतपत तरी ओढ लागलीये.
ReplyDeleteसर्वांना खूप खूप धन्यवाद...
ReplyDelete@स्वान्ड्या - कविता अप्रतिम झाली आहे!!!
@पवन - मी नाजूक दादाचे 'रेला रेला' ऐकले. तो खूप अवलिया माणूस आहे. नुसत्या उड्या मारत होता. लोकांना हसवत होता. पपेट शो करत होता. भारी वाटलं. आणि हो, Suggestion बद्दल धन्यवाद.
@गायत्री - तू खरच शोधग्रामला कधीही ये... तुला नक्की आवडेल.
सुरेख लेख. इथे दिल्याबद्दल अनेक आभार. :)
ReplyDeleteबारुक्खान, आगे बढो, हम तुम्हारे साथ है।
ReplyDeleteह्या लेखाबद्दल आभारी आहे!
very nice....realy good
ReplyDeleteLekh khup chhan watla re bhau.
ReplyDeleteva nikhil, tu khoop sanvedanashil manane sagale tipalele aahe. asech lihit raha. te ek chan doccumentation hoil.
ReplyDeleteanil awachat.
Bhendikanar cha divas tuzya manavar korala gela tar kay naval , tuze he varnan ch mazya manavar korale gele.
ReplyDelete